Ad will apear here
Next
शिस्तप्रिय टिकेकर बाई
उगार खुर्द (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयातल्या शिक्षिका लीलाताई टिकेकर आठ मार्च २०२१ या दिवशी नव्वदी पार करून ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर लिहिलेला हा लेख.....
.....
‘इयत्ता पाचवी अ’ असे लिहिलेल्या वर्गामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी कुतुहलाने ‘आता कोण शिक्षक येतील’ याची वाट पाहत होतो. हसतमुखाने बाई आल्या.

‘नमस्ते मुलांनो. मी तुमची क्लासटीचर लीला टिकेकर. मी आता तुमची हजेरी घेणार आहे. मी एकेकाचे नाव घेत जाईन. मुलांनी म्हणायचे ‘उपस्थितोस्मि’ आणि मुलींनी म्हणायचे ‘उपस्थितास्मि.’ 

नवीन वर्ग, नवीन बाई आणि नवीन पद्धतीने हजेरी, तीदेखील संस्कृतमध्ये. असलं भारी वाटलं म्हणून सांगू! प्रथम जरा जड गेलं; पण नंतर बाईंनी घटवून घेतलेले ते संस्कृत उच्चार आजही मनात ताजे आहेत.

बाई आम्हाला मराठी आणि हिंदी शिकवायच्या. हिंदी विषयातली पंडित ही पदवी त्यांनी मिळवली होती. त्यामुळे हिंदीवर त्यांचे प्रभुत्व होते. दोन्ही विषय त्या अगदी मनापासून शिकवायच्या.

एकदा त्यांनी विचारले, ‘आपल्या चेहऱ्यासंबंधी मराठी म्हणी कुणाकुणाला येतात?’ मी पटकन हात वर केला. ‘नाका डोळा करणे...’ बाईंना हसूच आवरेना. माझा चेहरा गोरामोरा झाला. बाई जवळ येऊन म्हणाल्या, ‘अगं बाळा, कानाडोळा करणे अशी म्हण आहे.’ आणि माझ्यासकट सगळा वर्ग जोरजोरात हसायला लागला. मग खेळीमेळीत त्यांनी अनेक म्हणींचा वापर कसा करावा हे शिकवले.

बाईंना डोळे भरून पाहणे, त्यांचे मृदू बोल ऐकून कान तृप्त होणे, त्यांना भेटून एक वेगळी ऊर्जा घेऊन येणे असा योग अलीकडे बरेच वेळा आला. स्मिता वहिनी शिरगावकर यांनी बरेच वेळा मला उगारला आमंत्रित केले. त्यामुळे टिकेकर बाईंना खूप वेळा भेटता आले. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला बाई आवर्जून उपस्थित राहायच्या व कौतुक करायच्या. 

एकदा कारेकर बाईंच्या पुण्यतिथीनिमित्त मला बोलावले होते. तिथे अगदी आयत्या वेळी स्मिता वहिनींनी त्यांना ‘तुम्हीपण कारेकर बाईंबद्दल बोला,’ असे सांगताच बाई खूप छान बोलल्या. तोच आत्मविश्वास, तेच स्पष्ट उच्चार आणि अस्खलित बोलणे ऐकून आम्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.

२००३ साली मला रामतीर्थकर मास्तर स्मृती पुरस्कार मिळाला. बाईंना खूप आनंद झाला. त्यांनी मला एक छान पिशवी भेट दिली. बाईंचा आशीर्वाद समजून मी ती प्रत्येक प्रवासात बरोबर घेत असते. त्यात माझा कॅमेरा, पैसे, पाण्याची बाटली, खाऊ असे सुरक्षित असते. राजस्थान सहलीत एकदा एके ठिकाणी मी ती पिशवी विसरले. दोन तासांनी माझ्या लक्षात आले. त्या वेळी तो कॅमेरा (कोडॅक कंपनीचा) माझा जीव की प्राण होता. माझी सैरभैर अवस्था ओळखून टूर मॅनेजरने एका मुलाला भाड्याची सायकल घेऊन आम्ही जिथे जिथे गेलो होतो तिथे तपास करण्यास पाठवले. आणि अहो आश्चर्यम्! एका बागेत एका बेंचवर माझी ती पिशवी सुखरूप सापडली. हजारो माणसे तिथे येऊन गेली असतील; पण बाईंच्या आशीर्वादामुळे माझा सारा ऐवज सहीसलामत माझ्या हातात आला. टूरमधील प्रत्येकाला आश्चर्य वाटले. ती पिशवी मी अजून जपून ठेवली आहे.

आमच्या शाळेच्या खेळांच्या स्पर्धा तालुका पातळीवर अथणीला असतात. २५-३० विद्यार्थी घेऊन केकरे मास्तर व टिकेकर बाई आम्हाला घेऊन जात. बसमध्ये आम्ही भरपूर दंगा करत असू. गाण्याच्या भेंड्या, गमतीदार कोडी चढाओढीनं खेळत असू. बाई कधीही रागावल्या नाहीत. 

त्या वेळचे एक कोडे अजून लक्षात आहे ‘fox पूरची MANGO LADY, U, ME BREAD’

शाळेतदेखील बाईंनी कधीही हातात छडी घेतलेली आठवत नाही.

बाईंनी मॅट्रिकनंतर एसटीसी केले व त्या शाळेत शिक्षिका म्हणून आल्या. नंतर त्यांनी बीए केलं. त्यानंतर एक वर्षाची रजा घेऊन त्या बेळगावला गेल्या व बीएडची पदवी घेऊन परत शाळेत आल्या. हिंदी ‘ पंडित’ असल्यामुळे त्यांचे हिंदीवर प्रभुत्व होते.

बाई अत्यंत व्यवस्थित राहायच्या. साडी खूप छान नेसायच्या. त्या वेळेला पीनप करणे वगैरे प्रकार नव्हते; पण त्या छान साडी नेसायच्या. भरपूर उंची, शेलाटा बांधा, लांबसडक केसांच्या दोन जाडजूड वेण्या आणि कायम हसतमुख चेहरा. आता वयोमानानुसार त्या थोड्याशा थकल्यासारख्या दिसतात. मी २०१८ साली त्यांना भेटले. भरपूर गप्पा मारल्या.

आठ मार्च २०२१ या दिवशी त्या नव्वदी पार करून ९१व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अजूनही आत्मनिर्भर आहेत. वाचनाची आवड कायम आहे. वर्तमानपत्रातली कोडी अचूक सोडवतात.

बाई, आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने परमेश्वराजवळ एकच प्रार्थना - ‘तुमचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे भरभराटीचे व आरोग्यसंपन्न असू दे. जीवेत शरदः शतम्’

- सौ. कुंदा कुलकर्णी-ग्रामोपाध्ये, कोथरूड, पुणे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AUHKCW
Similar Posts
आदरणीय रामतीर्थकर मास्तर उगार (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयाला नावारूपाला आणण्यासाठी श्रीनिवास अनंत रामतीर्थकर मास्तर यांनी आपले तन-मन-धन पणाला लावले होते. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. सात डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या एका विद्यार्थिनीने लिहिलेला हा लेख...
सर्वांच्या लाडक्या कारेकर बाई उगार खुर्द (बेळगाव) येथील श्रीहरी विद्यालयातल्या, सर्वांच्या लाडक्या कारेकर बाई यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. त्या निमित्ताने त्यांच्या एका विद्यार्थिनीने त्यांच्यावर लिहिलेला हा लेख...
‘हास्यरेषांचा आनंदयात्री’ २९ जुलै हा हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language